सध्याच्या काळात पालक आपल्या मुलांना सुशिक्षित बनवण्यासाठी मोठमोठ्या कॉन्व्हेन्ट स्कूल्स मध्ये घालतात. नव्हे नव्हे तर परदेशी शिक्षण पद्धती उच्च आहे असे समजून दूरदेशात आपल्या पाल्ल्याला शिक्षणासाठी पाठवतात. यातच अमेरिकेत स्थित असणाऱ्या शेळके कुटुंबीयांनी आपल्या मुलाला थेट आटपाडीच्या जिल्हा परिषद क्र.1 या शाळेत इयत्ता दुसरी मध्ये दाखल केले आहे.
विजयकुमार शेळके व भरती शेळके हे सध्या न्यूयॉर्कमध्ये आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा विहान याचं शिक्षण उत्तर कॅरोलिनाच्या शार्लोट येथील हॉक रिज प्राथमिक शाळेत सुरू झालं होतं. मात्र, मराठी भाषेशी त्याचं व शिक्षणाशी घट्ट नातं तयार व्हावं, मातीत रुजलेली मूल्यं आत्मसात व्हावीत, या उद्देशाने पालकांनी विहानचं शिक्षण काही काळासाठी भारतातच, तेही मराठी माध्यमातून करायचा असा निर्णय घेतला.
डॉ. उमेश बालटे हे विहान चे मामा सध्या आटपाडी तालुक्यात राहतात. शेळके कुटुंबीय मुळचे सांगोळ्याचे असले तरी विहान साठी त्यांनी त्याच्या आजोळमधली जिल्हा परिषद शाळा क्र. 1 ची निवड केली.
सोमवारी विहानसह इतर नवीन विद्यार्थ्यांचे गुलाबफूल देऊन स्वागत करण्यात आलं. त्यावेळी विहान चे मामा म्हणाले “मुलाला मराठी कसलेच बोलता येत नाही. त्याचा संभाळ करत असतानाही अनेक अडचणी येत असल्याने व आपल्या मातीशी मुलाची नाळ जोडली जावी म्हणून त्यांच्या आईवडिलांनी विहानचा प्रवेश आटपाडी येथील मराठी शाळेत घेतला.”